जळगावमहाराष्ट्र

माळीवाडा परिसरातील गटारीच्या पाण्याने रस्त्याचे तलावात रूपांतर; नागरिक संतप्त

एरंडोल प्रतिनिधी : शहरातील माळीवाडा परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर साचल्याने संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मात्र संबंधित नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माळीवाडा परिसरातील गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. परिणामी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. यामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पाण्यातून मार्ग काढताना अनेकदा घसरून अपघात होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात समस्या आणखी गंभीर होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी उपरोधिक पद्धतीने मागणी केली आहे. “नगरपालिकेला जर हा तलाव दिसत नसेल, तर या साचलेल्या पाण्यात मासे सोडून अधिकृत मत्स्य तलावच जाहीर करावा,” अशी उपहासात्मक प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. परिसरातील नागरिकांमध्ये ही मागणी चर्चेचा विषय ठरत असून प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी तात्काळ गटारींची स्वच्छता करून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आता नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणार का, की माळीवाडा परिसरातील हा “कृत्रिम तलाव” असाच कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button