जळगावमहाराष्ट्र

रेणुका जाधव यांचे वकिली क्षेत्रात यशस्वी पदार्पण

प्रतिनिधी एरंडोल – शहरातील न्यायव्यवस्थेशी दीर्घकाळापासून निगडित असलेल्या जाधव कुटुंबासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी ॲड. रेणुका चंद्रकला गोपाल जाधव यांनी केली आहे. कायद्याचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी वकिली व्यवसायात अधिकृत प्रवेश केला असून त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एरंडोल न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत असलेले कोर्ट कर्मचारी गोपाल जाधव यांच्या कन्या आहेत. लहानपणापासून न्यायालयीन वातावरणाचा जवळून अनुभव आणि कायद्याविषयी असलेली आवड यामुळे त्यांनी विधी शिक्षणाची वाट निवडली. पाच वर्षांच्या कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त करत वकिली क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे.
कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी विविध विषयांचा सखोल अभ्यास करून न्यायव्यवस्थेची बारकाईने माहिती आत्मसात केली. त्यांच्या मेहनतीला कुटुंबीयांचे पाठबळ तसेच अनुभवी विधिज्ञ आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः त्यांना त्यांच्या वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच एरंडोल येथे कार्यरत राहिलेले न्यायाधीश यांच्याकडूनही त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगितले जाते.
वकिली क्षेत्रात प्रवेश करताना न्याय, सत्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा जपत समाजातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कायद्याचे ज्ञान समाजहितासाठी वापरत दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सदैव तत्पर राहतील, असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रेणुका जाधव यांच्या या यशाबद्दल त्यांच्या महाविद्यालयाचे डीन डॉ. युवाकुमार रेड्डी, डॉ. योगेश महाजन, नाभिक समाजाचे अध्यक्ष रामभाऊ गांगुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
भविष्यात आपल्या ज्ञान, कर्तृत्व, मेहनत आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर ॲड. रेणुका जाधव या कायदा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करतील तसेच समाजात न्याय, संविधान आणि कायद्याबाबत जनजागृती घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या यशामुळे एरंडोल शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button