जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय, एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

प्रतिनिधी एरंडोल : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील नगर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘मराठी भाषा खरोखर अभिजात आहे’ या विषयावर आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाषिक समृद्धीसाठी विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, चिंतन, वाचन, लेखन आणि भाषण कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध माध्यमिक शाळांमधून प्रत्येकी दोन प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी प्रभावी व ओघवत्या शैलीत मराठी भाषेची थोरवी मांडत श्रोत्यांची दाद मिळवली. विशेषतः विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग हा कार्यक्रमाचे आकर्षण ठरला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक रा.ति. काबरे विद्यालयाच्या कु. अभिलाषा समाधान पाटील हिने पटकाविला. द्वितीय क्रमांकही रा.ति. काबरे विद्यालयाच्या कु. वैष्णवी राजू महाजन हिने मिळविला, तर तृतीय क्रमांक गोपी गोल्ड स्कूलच्या कु. दीप्ती विजयसिंग पाटील हिने मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक जिजामाता माध्यमिक शाळेच्या कु. खुशी कल्याण पाटील हिला प्रदान करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, वाचनीय पुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ देविदास ठाकूर होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्रा. वा. ना. आंधळे, चिटणीस रवींद्र चिंतामण लाळगे, सहचिटणीस संतोष वेडू वंजारी, संचालक प्रवीण आधार महाजन, गुरुदास तुकाराम पाटील, परेश किशोर बिर्ला व डॉ. प्रेमराज गंगाधर पळशीकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन पत्रकार तथा संचालक प्रवीण आधार महाजन यांनी केले. प्रा. आंधळे यांनी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेवर भाष्य करत स्पर्धकांच्या वाक्पटुत्वाचे कौतुक केले. रवींद्र लाळगे यांनी मराठी भाषेच्या सौंदर्याविषयी चिंतन मांडले. अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे प्राचीनत्व, शब्दसंपत्ती आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या भाषा संवर्धनातील कार्याचा उल्लेख करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण सुधीर मोतीराम साळुंखे, सुचेता सुभाष साळुंखे, ज्योती मंदार वडगावकर व विशाल काळे यांनी केले. परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल देवेंद्र संतोष वंजारी, लिपिक संजय बाळकृष्ण अग्निहोत्री, शिपाई गोकुळ अरुण मोरे तसेच अमोल अशोक काबरा यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रवीण आधार महाजन यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button