एरंडोलमध्ये आदिवासी विकास विभागाचे उपविभागीय कार्यालय तातडीने सुरू करा

आमदार ॲड.अमोल पाटील यांची आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्याकडे मागणी; पारोळा येथे शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृह मंजूर करण्याचीही मागणी
एरंडोल : एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना विविध शासकीय योजना, दाखले, प्रमाणपत्रे तसेच आदिवासी विकास विभागाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी यावल येथे जावे लागत असल्याने नागरिकांना वेळ, पैसा आणि श्रमाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही गैरसोय दूर करून शासकीय सुविधा नागरिकांच्या स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी एरंडोल येथे आदिवासी विकास विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली असतानाही अद्याप अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित झालेला नाही. त्यामुळे हे कार्यालय तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आमदार ॲड.अमोल पाटील यांनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली.
यावेळी आमदार ॲड. अमोल पाटील यांनी या संदर्भातील सविस्तर लेखी निवेदन मंत्री महोदयांना सादर केले. एरंडोल येथे उपविभागीय कार्यालय सुरू झाल्यास मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ स्थानिक पातळीवरच मिळणार असून, यावलपर्यंत करावी लागणारी त्यांची धावपळ आणि अनावश्यक खर्च थांबणार आहे.
दरम्यान, एरंडोल विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक निवास व्यवस्था मिळावी, यासाठी पारोळा येथे शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृह मंजूर करण्याची मागणीही आमदार ॲड. अमोल पाटील यांनी केली. याबाबतही आदिवासी विकासमंत्र्यांना सविस्तर निवेदन देऊन सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.
एरंडोल येथे आदिवासी विकास विभागाचे उपविभागीय कार्यालय आणि पारोळा येथे शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृह सुरू झाल्यास मतदारसंघातील आदिवासी नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
या दोन्ही मागण्यांसाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार आबासाहेब चिमणराव पाटील आणि आमदार अॅड. अमोल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आमदार ॲड. अमोल पाटील यांचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





