रा. ति. काबरे विद्यालयात स्नेहसंमेलनातून नवीन वर्षाची उत्साही सुरुवात

एरंडोल प्रतिनिधी : येथील रा. ति. काबरे विद्यालयात नवीन वर्ष २०२६ चे स्वागत स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला होता.
दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी शाळेच्या मैदानी खेळांचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी यांच्या हस्ते झाले. दुपारच्या सत्रात ढोल-पथक व लेझीमच्या गजरात मान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, गटशिक्षणाधिकारी श्री. आर. डी. महाजन उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. काकाजी शरदचंद्रजी काबरे, उपाध्यक्ष ॲड. महेशजी काबरे, सचिव श्री. राजूभाऊ मणियार, सहसचिव श्री. धीरज काबरे, विविध शालेय समित्यांचे अध्यक्ष, संस्थेचे पदाधिकारी, समाजसेवक, नगरसेवक, पालक संघाचे सदस्य तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात रा. ही. जाजू विद्या मंदिराच्या इयत्ता पहिली ते चौथी तसेच रा. ति. काबरे विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित लोकनाटिका, विविध नृत्यप्रकार व नवीन वर्षाच्या शुभेच्छांवर आधारित सादरीकरण केले. या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी यांनी उपस्थितांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले. शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील स्नेह वृद्धिंगत व्हावा, यासाठी खेळ व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
पालकांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. रा. ति. काबरे विद्यालय हे एरंडोल परिसरातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




