दापोरी येथे फलोत्पादन पिकावरील कीड-रोग व्यवस्थापनाबाबत शेतकरी प्रशिक्षण.

प्रतिनिधी एरंडोल :- तालुक्यातील दापोरी येथे कृषी विभागाच्या वतीने सन २०२६-२७ अंतर्गत फलोत्पादन पिकावरील कीड व रोग सल्ला व व्यवस्थापन या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दापोरीचे सरपंच कुंदन कोळी होते. यावेळी ईश्वरलाल चिंधू पाटील यांच्यासह परिसरातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणात केळी संशोधन केंद्र, जळगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. नितीन सातपुते यांनी केळी पिकावरील विविध कीड व रोगांची ओळख, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आधुनिक व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथील शास्त्रज्ञ प्रवीण गोरे यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती अवलंबण्याचे महत्त्व तसेच प्रक्रिया उद्योग उभारणीच्या संधींबाबत माहिती दिली.
मंडळ कृषी अधिकारी ईश्वर पवार यांनी माती परीक्षणावर आधारित अल्प खर्चिक नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सहाय्यक कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी ‘महाविस्तार कृषी’ अॅपच्या विविध सुविधांची माहिती दिली, तर सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पाटील यांनी खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक कृषी अधिकारी पल्लवी चौधरी व प्रतीक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषी तंत्रज्ञान व शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





