उत्राण येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी एरंडोल : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत उत्राण मंडळ, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी मंजुषा घाडगे व तहसीलदार गोपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरावरील अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला. पुरवठा शाखेमार्फत ३२ अन्न सुरक्षा लाभ व नवीन/दुबार शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. संगायो शाखेमार्फत २१ लाभार्थ्यांची DBT व DLC प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, तसेच ४७ हयात प्रमाणपत्रे व ५ नवीन अर्ज स्वीकारण्यात आले. सेतु शाखेतून ५७ उत्पन्न, ५२ राष्ट्रीयत्व, ४१ रहिवासी व २५ जातीचे दाखले वितरित करण्यात आले, तर ३५ आधार नोंदणी करण्यात आल्या.
पंचायत समितीमार्फत २ जलतारा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बालविकास विभागाने २ लाभार्थ्यांना बेबी किट वाटप केले. तालुका आरोग्य विभागाकडून जननी सुरक्षा योजना (०४), प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (०२), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (०३) तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (०७) अंतर्गत लाभार्थ्यांना सहाय्य वितरित करण्यात आले.
कृषी विभागामार्फत ४ शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेचा लाभ देण्यात आला, तसेच महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर व मशिनरीचे वाटप करण्यात आले. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत २ लाभार्थ्यांना मदत देण्यात आली.
शिबिराच्या ठिकाणी विविध विभागांचे माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती मिळाली. या उपक्रमात सुमारे ७५० ते ९०० नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली. शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तहसीलदार गोपाल पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शिबिराचे नियोजन नोडल अधिकारी संजय घुले (निवासी नायब तहसीलदार), अमोल बन व किशोर माळी (नायब तहसीलदार) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडल अधिकारी उत्राण, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी प्रशासनाच्या वतीने उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.





