एरंडोलच्या पाटील कुटुंबाचा सन्मान, जितेंद्र पाटील राज्य वैद्यकीय अध्यक्षपदी, तर सरोजबाई पाटील यांची जळगाव जिल्हा वरिष्ठ महिला संघटकपदी निवड…………..!

प्रतिनिधी एरंडोल – श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या (एकीकृत राष्ट्रीय राजपूत युवा संगठन भारत) महाराष्ट्र राज्य व जळगाव जिल्हा कार्यकारिणीत एरंडोल येथील माय-लेकांनी आपल्या सामाजिक कर्तृत्वाच्या बळावर महत्त्वपूर्ण पदांवर गवसणी घातली आहे. सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत जितेंद्र केवलसिंह पाटील यांची वैद्यकीय आघाडीच्या ‘महाराष्ट्र राज्य अध्यक्ष’ पदी, तर त्यांच्या मातोश्री सरोजबाई केवलसिंग पाटील यांची ‘जळगाव जिल्हा वरिष्ठ महिला संघटक’ पदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती १ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीसाठी लागू असेल.
राज्य वैद्यकीय अध्यक्ष म्हणून निवड झालेले जितेंद्र केवलसिंह पाटील यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात ‘ आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन ‘ द्वारे मुंबई व ठाण्यातील १०३ नामांकित रुग्णालयांच्या सहकार्याने ३० हजारांपेक्षा जास्त गरजू रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली आहे.त्यांच्या उल्लेखनीय निष्काम सेवेसाठी ४ आंतरराष्ट्रीय व २५६ राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सरोजबाई केवलसिंग पाटील जळगाव जिल्हा वरिष्ठ महिला संघटक म्हणून निवड झालेल्या सरोजबाई केवलसिंग पाटील यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून गेल्या २० वर्षांपासून महिला सक्षमीकरण, बचत गट बळकटीकरण, कौटुंबिक समुपदेशन व शासकीय योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार ‘ प्राप्त झाला आहे.
या दुहेरी नियुक्तीमुळे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेला संघटनात्मक बळ मिळणार असून, एरंडोल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्हा व राजपूत समाजातून या माय-लेकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





