एरंडोलला नगर परिषद निवडणुकीत मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद,सरासरी ७५ टक्के झाले मतदान.

प्रतिनिधी – एरंडोल येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह ११ प्रभागातील २२ जागांसाठी ३१ हजार ३८५ मतदारांपैकी २३ हजार ४९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी संपूर्ण सरासरी ७५.१९ टक्के मतदान झाले.शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून संथ गतीने मतदानास सुरुवात झाली.दुपारी १२ वाजेनंतर मात्र काही ठिकाणी गर्दी होत गेली.४ वाजेनंतर मात्र सर्वच मतदान केंद्रांवर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती.युवक व महिलांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.वयोवृद्ध मतदारांना उमेदवारांच्या प्रतिनिधींनी व्हीलचेअरवर मतदान केंद्रापर्यंत आणले.किरकोळ वादविवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह ११ प्रभागांसाठी झालेल्या
निवडणुकीत शहरातील ३८ मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत पार पडले.दादासाहेब दि.शं.पाटील महाविद्यालयातील प्रभाग क्रमांक दोन व सातच्या मतदान केंद्रावर सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरु होते.सकाळपासूनच उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या भेटी घेवून मतदान करण्याचे आवाहन करीत होते.वयोवृद्ध मतदारांना व्हीलचेअरवर तसेच सहाय्यकाच्या सहाय्याने मतदान केंद्रावर नेत मतदान करीत होते.मतदानात महिला व युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
आधी मतदान,नंतर लग्न प्रभाग क्रमांक तीन मधील महात्मा फुले हायस्कूलमध्ये योगेश भागवत मांडेवाळ या नवरदेवाने विवाहापूर्वी मतदान केले.मतदान केंद्रावर मतदारांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत होते.मात्र मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली.मतदान केंद्रांवर मंडप नसल्यामुळे मतदारांना दुपारी उन्हातच उभे रहावे लागले.किरकोळ वादविवाद वगळता सर्व केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिकेचे प्रशासक अमोल बागुल यांनी सर्व मतदान केंद्रांवर भेटी देवून मतदानाची पाहणी केली.यावेळी मतदान केंद्रांवर एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी,गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी,नगर पालिकेचे कर्मचारी,बी.एल. ओ.यांनी परिश्रम घेतले.




