जळगावमहाराष्ट्र

दीपस्तंभ ३ दिवसीय व्याख्यानमालेची उत्साहात सुरुवात.

दीपक करंजीकर यांचे ‘उद्याचा भारत आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन

एरंडोल | प्रतिनिधी -दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय व्याख्यानमालेची सुरुवात ज्येष्ठ विचारवंत दीपक करंजीकर यांच्या ‘उद्याचा भारत आणि आपण’ या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानाने झाली.
आपल्या व्याख्यानात करंजीकर यांनी भारताच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रवासावर सखोल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था आज जागतिक पातळीवर ८व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आली आहे, ही अभिमानाची बाब असून पुढील काळात भारत अधिक सक्षम होईल. राजकीय सत्ता अस्थिर असते; मात्र संस्कृती व समाज हे उद्याच्या भारताचे मजबूत स्तंभ (व्हर्टिकल्स) असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताने तब्बल ११०० वर्षे परकीय आक्रमणे सहन केली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या ३५ वर्षांत त्या आक्रमणांना प्रभावीपणे थोपवले, असे सांगत त्यांनी भारतीय नेतृत्व परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजांनी भारतीय समाजाला जातव्यवस्थेत अडकवून आत्मवंचनेत ढकलले, असे मत त्यांनी केला.
“उद्याचा भारत घडताना आपण कुठे आहोत, याचे आत्मपरीक्षण प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. News या शब्दाचा अर्थ North, East, West, South येथून येणारी माहिती असा असून, माहिती समजून घेण्याची दृष्टिकोनात्मक भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. २०५० साली भारत महासत्ता बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. जी. आर. महाजन (योगेश्वर पतसंस्था) यांनी केली. डॉ. रवी महाजन यांच्या हस्ते मुख्य वक्ते दीपक करंजीकर यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी दीपस्तंभचे संस्थापक यजुरवेंद्र महाजन, डॉ. रवी महाजन, डॉ. रेखा महाजन, मा. एम. एम. पाटील, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. शरदभाऊ काबरा, सचिव राजीव मणियार, शालेय समितीचे चेअरमन अनिलभाऊ बिर्ला तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील राठी हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

याच कार्यक्रमात पॉवर लिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केलेल्या सपना पारधी या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे व उदंड प्रतिसादाबद्दल उपस्थित श्रोत्यांचे डॉ. स्नेहा राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button