जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोल पंचायत समितीतील लिपीक वर्ग बेमुदत संपावर; विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र

प्रतिनिधी एरंडोल:- राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती, एरंडोल येथील लिपीक वर्गीय अधिकारी व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
          संघटनेचे मा. राजाध्यक्ष यांच्या दि. १२ फेब्रुवारी २०२६ च्या पत्राच्या संदर्भाने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. दि. १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत संपूर्ण कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
            लिपीक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून असलेल्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावर प्रतीक्षासूचीवरील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, तसेच गोदावरी महामंडळ स्वायत्त करताना वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फत करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
             पंचायत समिती, एरंडोल येथील लिपीक वर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी असल्याची स्वाक्षरीयुक्त यादीही निवेदनासोबत सादर केली आहे.
             दरम्यान, या बेमुदत संपामुळे पंचायत समितीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, नागरिकांची कामे प्रलंबित राहण्याची चिन्हे दिसत आहेत. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button