जळगावमहाराष्ट्र

व्यसनमुक्त समाजासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर

प्रतिनिधी एरंडोल :-  नशामुक्त भारत अभियानांतर्गत एरंडोल शहरात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. युवक हे देशाचे भविष्य असून त्यांनी व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी केले.
          सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत, जिल्हा परिषद जळगावच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने तसेच संजीवन व्यसनमुक्ती केंद्र, एरंडोल यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी बोलताना त्यांनी व्यसनाधीनता ही देशासमोरील गंभीर समस्या असल्याचे सांगत, नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती होत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी दादाजी जाधव, समाज कल्याण कार्यालय अधीक्षक टी. एस. तडवी, समाज कल्याण निरीक्षक चेतन साळुंखे, माजी नगरसेवक विजय महाजन तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर बिराडे उपस्थित होते.

गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करत, व्यसनामुळे विविध आजारांचा धोका वाढतो व कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होते, असे सांगितले. व्यसन ही समाजाला लागलेली कीड असून त्याचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
          कार्यक्रमादरम्यान जनजागृती स्टॉल, पथनाट्य, विविध स्पर्धा व चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लोककलेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. वहीगायन, गोंधळ व पथनाट्य सादर करून कलाकारांनी व्यसनाचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले. शाहीर विनोदी ढगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या पथ नाट्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
          या मोहिमेत श १५० ते २०० युवकांनी नशामुक्ती संकल्पपत्र भरून व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक राजेंद्र ठाकरे यांनी केले. यावेळी गोकुळ पाटील, हैबतराव पाटील, डॉ. प्रशांत पाटील, चिंतामण चौधरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button