जळगावमहाराष्ट्र

एरंडोलमध्ये माजी सैनिक संघटनेला सभागृहाची भेट; आ. अमोल पाटील यांचा पुढाकार..

प्रतिनिधी एरंडोल :- शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. माजी सैनिक संघटना “खान्देश रक्षक”, एरंडोल यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत त्यांच्या सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी सुमारे २५ लाख रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृह उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय आमदार अमोल पाटील यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे प्रतीक मानला जात आहे.
माजी सैनिक संघटना “खान्देश रक्षक” ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून एरंडोल परिसरात विविध सामाजिक, राष्ट्रप्रेम जागवणारे तसेच युवकांना प्रेरणा देणारे उपक्रम राबवत आहे. संघटनेच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान, युवकांना सैन्यात भरतीसाठी मार्गदर्शन, देशभक्तीपर कार्यक्रम, सामाजिक जनजागृती मोहिमा आदी उपक्रम सातत्याने राबविले जातात. या सर्व उपक्रमांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज सभागृहाची गरज संघटनेने व्यक्त केली होती.
या मागणीची दखल घेत २५ लाख रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या सभागृहाच्या उभारणीमुळे संघटनेला विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच युवकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर शहरातील विविध सामाजिक संस्थांनाही या सभागृहाचा लाभ होणार असल्याने एरंडोलमधील सामाजिक चळवळींना नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शहरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देत प्रत्येक मागणीवर सकारात्मक भूमिका घेत कामे मार्गी लावण्याचा संकल्प कायम राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयामुळे माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच एरंडोलमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार अमोल पाटील यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button