एरंडोल परिसरात डिझेल टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

एरंडोल – शहरासह ग्रामीण परिसरात गेल्या मध्यरात्रीपासून डिझेल टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारक, शेतकरी आणि ट्रॅक्टर धारकांची डिझेलसाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या वेळीच इंधन तुटवडा निर्माण झाल्याने बळीराजा संकटात सापडला असून, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
आगामी मान्सूनपूर्व शेतीकामांसाठी, नांगरणी आणि मशागतीसाठी सध्या ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. त्यामुळे डिझेलची मागणी अचानक वाढली आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर “डिझेल शिल्लक नाही” असे फलक झळकल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. ज्या पंपांवर थोडाफार साठा शिल्लक आहे, तिथे नागरिक तासन्तास रांगा लावून उभे आहेत. अनेक शेतकरी पुढील कामांचा विचार करून ड्रम आणि कॅन घेऊन डिझेल खरेदीसाठी झुंबड करत आहेत. डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एका गावातून दुसऱ्या गावात भटकंती करावी लागत आहे.




