एरंडोल नगरपरिषदेचा १६० वा वर्धापन दिन उत्साहातई-ऑफिस प्रणालीचा शुभारंभ; ‘स्मृतीवन’ उपक्रमाची सुरुवात; सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती आदेश

प्रतिनिधी- एरंडोल नगरपरिषदेचा १६० वा वर्धापन दिन नगरपालिका सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ‘स्मृतीवन’ या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. लाड पांगे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना यावेळी नियुक्ती आदेशही प्रदान करण्यात आले.
गेल्या १६० वर्षांत एरंडोल नगरपरिषदेने शहराच्या विकासात आणि नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या गौरवशाली परंपरेला आधुनिकतेची जोड देत १ सप्टेंबर २०२६ पासून नगरपरिषदेचा प्रशासकीय कारभार ई-ऑफिस प्रणालीद्वारे सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणाली सुरू करणाऱ्या मोजक्या नगरपरिषदांमध्ये एरंडोलचा समावेश झाला आहे.
कागदविरहित कारभारामुळे कामकाजाला गती
ई-ऑफिसमुळे कार्यालयीन कामकाज कागदविरहित व डिजिटल होणार आहे. फाईल तयार करणे, तिची हालचाल, मंजुरी आणि निपटारा अधिक जलद व पारदर्शक पद्धतीने करता येणार आहे. फाईल कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे, तिची सद्यस्थिती काय आहे, याचा सहज मागोवा घेता येणार आहे.
यामुळे निर्णय प्रक्रियेला गती मिळण्यासोबतच प्रशासकीय कार्यक्षमता वाढणार आहे. कागद, छपाई व फाईल साठवणुकीवरील खर्चात बचत होणार असून महत्त्वाच्या नोंदी डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता येणार आहेत. परिणामी नागरिकांना अधिक जलद आणि पारदर्शक नागरी सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
‘स्मृतीवन’मधून आठवणींना वृक्षरूप
१६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेने ‘स्मृतीवन’ हा भावनिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला. प्रिय व्यक्तीच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी त्यांच्या नावाने वृक्षारोपण करण्याची संकल्पना या उपक्रमातून साकारण्यात आली आहे.
नागरिकांना ₹५०० देणगी देऊन प्रिय व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष लावता येणार असून त्यास ट्री गार्ड आणि संबंधित व्यक्तीच्या नावाचा स्मृतीफलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे स्मृती जपण्यासोबतच पर्यावरण संवर्धनातही नागरिकांचा सहभाग वाढणार आहे.
‘माणसं निघून जातात, आठवणी राहतात; आठवणींना वृक्षरूप दिलं तर त्या पिढ्यान्पिढ्या जगतात,’ या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती
लाड पांगे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी आणि मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या हस्ते अविनाश वाघ आणि पिंकी पवार यांना सफाई कामगार पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी उपस्थित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविकांना गुलाबपुष्प देऊन नगरपरिषदेच्या १६० व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शिवसेना गटनेते मनोज भाऊ पाटील, रविंद्र महाजन, कल्पना मनोज पाटील, अमोल तंबोली, डॉ. गीतांजली ठाकूर, नरेंद्र पाटील, नितेश चौधरी, आरती महाजन, शारदा मराठे, भारती गुजर, अनिल महाजन, मनकरणाबाई चौधरी, सत्यभामाबाई पाटील, योगेश देवरे, कमलबाई पाटील, सुनिता माळी, छायाताई दाभाडे, प्रशांत महाजन, पठाण नायमखा दालशेर खा, कागजी नजमाबी सैय्यद, सैय्यद शबानाबी नसरुद्दीन, सय्यद इमरान अली जाफर अली यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
परंपरेतून आधुनिकतेकडे आणि आठवणींतून पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल करणारे ‘ई-ऑफिस’ आणि ‘स्मृतीवन’ हे उपक्रम एरंडोल नगरपरिषदेच्या १६० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत नवे पर्व ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




