एरंडोल मतदारसंघात ३२ हजार ५०२ मतदारांची नावे कमी

SIR-2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन
प्रतिनिधी एरंडोल:- विशेष सघन पुनरिक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत एरंडोल विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी SIR अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
SIR पूर्वी एरंडोल विधानसभा मतदारसंघात २ लाख ९२ हजार ३९६ मतदार होते. त्यापैकी २ लाख ४७ हजार ४२७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून १२ हजार ४६७ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. तपासणीदरम्यान ६ हजार ९५९ मृत, १६ हजार ७६६ कायमस्वरूपी स्थलांतरित, ४ हजार ८३० अनुपस्थित, ३ हजार ७५९ दुबार आणि १८७ ईएफ फॉर्म न भरलेले, अशा एकूण ३२ हजार ५०२ मतदारांची नावे कमी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
SIR अंतर्गत मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून मतदार केंद्रांची संख्या २९८ वरून ३०० करण्यात आली आहे. खडकेसीम व खडके बु. येथे प्रत्येकी एक नवीन मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे.
दि. ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ती संबंधित BLO, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच राजकीय पक्षांच्या WhatsApp गटामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. पात्र मतदाराचे नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६, तपशिलातील दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८, तर अपात्र मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ द्वारे अर्ज करता येईल.
ज्या मतदारांचे अथवा त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबांचे नाव सन २००२ च्या मतदार यादीत उपलब्ध नाही किंवा नाव अथवा वयामध्ये विसंगती आढळली आहे, अशा मतदारांना नियमानुसार सुनावणीची नोटीस देण्यात येणार आहे. संबंधितांनी नोटीसमध्ये नमूद दिनांक व वेळेस उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतदारांनी जन्मतारीख, जन्मस्थळ व नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे सादर करावीत. यामध्ये जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी/बारावीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी प्रमाणपत्र, कौटुंबिक नोंदवही, जात प्रमाणपत्र तसेच शासनमान्य इतर कागदपत्रांचा समावेश आहे.
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांच्या BLA व प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी , मनीष कुमार गायकवाड तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग यांनी केले आहे.




