२७ लाख रुग्णांना दिला उपचारांचा आधार; जितेंद्र पाटील राज्यस्तरीय ‘आरोग्यदूत पुरस्काराने’ सन्मानित

आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या माध्यमातून दशकभर समाजसेवा; ३० हजारांहून अधिक रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियांसाठी मोलाचे योगदान
प्रतिनिधी एरंडोल : आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करून लाखो रुग्णांना जीवनदान देणारे आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय आरोग्यदूत पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे सामाजिक व आरोग्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून जितेंद्र पाटील यांनी आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभरातील गरजू रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी मोठे कार्य उभे केले आहे. विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे २७ लाखांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच ३० हजारांपेक्षा अधिक रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
मुंबई, ठाणे आणि परिसरातील १०३ नामांकित रुग्णालयांमध्ये विविध शासकीय योजना, ट्रस्ट आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गरजू रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार होण्यासाठी नियोजन करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ते आधारवड ठरले आहेत.
आरोग्य व समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल जितेंद्र पाटील यांना आतापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय आणि २५६ राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘बेस्ट अचिव्हमेंट अवॉर्ड २०१८’, ‘ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड २०१९’, ‘हुनर रत्न अवॉर्ड २०२१’, ‘कुवेत आरोग्यदूत पुरस्कार २०२४’ आणि ‘राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार २०२५’ हे त्यांना मिळालेल्या प्रमुख सन्मानांपैकी आहेत.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित सरपंच संवाद मेळाव्यात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी राज्यभरातील सरपंच, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जितेंद्र पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





