भुसावळ–सुरत एक्सप्रेसमध्ये नवजात शिशू बेवारस; अमळनेर रेल्वे पोलिसांकडून शोधमोहीम

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस
अमळनेर (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवासादरम्यान बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या नवजात शिशूच्या पालकांचा शोध घेण्यासाठी अमळनेर रेल्वे पोलीस (GRP) यांनी जाहीर आवाहन केले आहे. या प्रकरणातील अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांकडून माहिती मागविण्यात आली असून, माहिती देणाऱ्यास १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे २०२५ रोजी ट्रेन क्रमांक १९००८ भुसावळ–सुरत एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये अंदाजे एक महिन्याच्या नवजात शिशूला सोडून देण्यात आले होते. हे शिशू धरणगाव ते अमळनेरदरम्यान रेल्वेगाडीत सोडून देण्यात आल्याचे पोलिसांच्या जाहीर आवाहनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशन, नंदुरबार येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२५ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ९४ अन्वये तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित अनोळखी महिलेचे वय अंदाजे २० ते २२ वर्षे आहे. सदर महिला किंवा बेवारस नवजात शिशूच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असून, उपयुक्त माहिती देणाऱ्यास १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
नागरिकांनी संपर्क साधावा
रेल्वे पोलीस स्टेशन, नंदुरबार
प्रभारी अधिकारी : राहुल त्र्यंबक शेजवळ
मोबाईल : ७०३०४४७००७ / ८७८८१५७८५८
बेवारस नवजात शिशूच्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर रेल्वे पोलीस (GRP) यांनी केले आहे.





