लोकसहभागातून वृक्षसंवर्धन; टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू..

प्रतिनिधी एरंडोल : तालुक्यातील कासोदा ते वनकोठा या सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील राज्य मार्गाच्या दुतर्फा दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन आणि हरित पट्टा निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातील रोपांचे संगोपन सातत्याने केले जात आहे.
या वृक्षांना दरवर्षी सुमारे आठ महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, यासाठी स्थानिक स्तरावरून मदत आणि सहकार्य मिळत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोपे तग धरून राहावीत यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत.
गावातील स्वामींचे सेवेकरी तसेच प्रतिष्ठित व्यापारी मनोज पिंगळे यांच्या पुढाकारातून टँकरद्वारे रोपांना पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच यापूर्वी दि. २४ रोजी मुकेश पारधी यांनीही टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देत वृक्षसंवर्धनात मोलाचे योगदान दिले होते.
आज पियुष पिंगळे यांनी स्वतः उपस्थित राहून रोपांना पाणी देण्याचे काम केले. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण जपण्याबाबत समाजात सकारात्मक संदेश जात असून, इतरांनीही अशा सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
लोकसहभागातून उभारलेला हा हरित उपक्रम आगामी काळात अधिक बळकट होऊन परिसर हिरवागार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




