जळगावमहाराष्ट्र

एकल महिलांच्या संघर्षाला सलाम; एरंडोल नगरपालिकेकडून कर्तृत्ववान महिलांचा गौरव

एरंडोल, प्रतिनिधी : एरंडोल नगरपालिकेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. येथील कर्मवीर अभ्यासिका हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला शहरातील सुमारे १०० एकल महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा देवरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे महत्त्व विशद करताना राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख केला. महिलांनी जीवनातील अडचणींना धैर्याने सामोरे जात स्वावलंबी बनावे तसेच नगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी एकल महिलांना समाजात येणाऱ्या विविध आव्हानांवर प्रकाश टाकला. “एकल महिलांना केवळ शासकीय मदतीचीच नव्हे, तर समाजाकडून संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मक दृष्टिकोनाचीही गरज आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा चोपडेकर, विमलबाई पाटील, रंजना जोगी आणि संगीता सोनवणे यांचा भारतीय संविधानाची प्रत, शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास शिवसेना गटनेते मनोजभाऊ पाटील, अनिल महाजन, रवींद्र महाजन, इमरान अली सय्यद, आरती महाजन, भारती गुजर, शारदा मराठे, नितेश चौधरी, कमल पाटील, प्रशांत महाजन, कृष्णा ओतारी, कागजी नजमाबी सय्यद, शबानाबी सय्यद, नसरुद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुसुम पाटील यांनी केले, तर महेंद्र पाटील यांनी आभार मानले. एकल महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button