खर्ची बुद्रुक येथे “रंगतरंग” वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील खर्ची बु जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खर्ची बुद्रुक येथे “रंगतरंग” या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपस्थित ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल माळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गावातील मान्यवर व्यक्ती व शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
या प्रसंगी आशाबाई विठ्ठल महाजन सरपंच, योगेश चव्हाण उपसरपंच, योगेश चुडामण माळी, शाळा समिती सदस्य, भुषण म्हस्के , सजन माळी, भुरा महाजन, अर्जुन मराठे, कैलास मराठे, दगडू माळी, आबा महाजन, गोपाल मराठे, सोपान माळी, नवल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लोकनृत्य तसेच मराठी, अहिराणी व हिंदी गाण्यांवर आधारित आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
“रंगतरंग” या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले असून ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षिका रेखा बाविस्कर मॅडम, मुर्लीधर महाजन सर, प्रिती चौधरी मॅडम व माधुरी बाविस्कर मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.
शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



