एरंडोलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात; मोटरसायकल रॅली व रक्तदान शिबिराचे आयोजन

एरंडोल (प्रतिनिधी) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती एरंडोल शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर शहरातील युवकांच्या सहभागातून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीदरम्यान शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. “जय ज्योती, जय क्रांती”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले पुतळा चौक येथे महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ६५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. उपनगराध्यक्ष सौ. सुनीता माळी व नगरसेविका सौ. आरती महाजन यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेत समाजाला त्यांच्या विचारांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, दशरथ महाजन, शोभाताई महाजन, उपनगराध्यक्ष सुनीता माळी, नगरसेविका आरती महाजन, नगरसेवक प्रा. मनोज पाटील, अनिल महाजन, मयूर महाजन, रवींद्र महाजन, योगेश महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, युवासेनेचे माजी जिल्हा समन्वयक अतुल महाजन, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, संजय महाजन, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष दुर्गादास महाजन, शिवसेनेचे जगदीश पाटील, युवा क्रांती मंचचे माजी अध्यक्ष कैलास महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर बिऱ्हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी महात्मा फुले चौकापासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा क्रांती मंचचे अध्यक्ष राहुल माळी, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव भावेश महाजन यांच्यासह गणेश महाजन, सचिन माळी, समाधान महाजन, कमलेश महाजन, नितीन महाजन आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.





