एरंडोल नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; अधिकारी, पथके व राजकीय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

एरंडोल प्रतिनिधी : एरंडोल नगरपरिषद पोटनिवडणूक २०२६ पारदर्शक, शांततापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने तयारीला वेग दिला असून मंगळवार दि. १९ मे रोजी दुपारी ४ वाजता नगरपालिका सभागृहात दोन महत्त्वपूर्ण आढावा बैठका संपन्न झाल्या.
या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी मा. अमोल बागुल, सहाय्यक निवडणूक अधिकारी मा. अमोल बन तसेच निवडणूक विभाग प्रमुख श्री हितेश जोगी उपस्थित होते. पहिल्या बैठकीत सर्व सेक्टर अधिकारी, सेक्टर पोलिस अधिकारी, नोडल अधिकारी, सहाय्यक कर्मचारी, FST, VST, VVT, SST, CRC टीममधील अधिकारी-कर्मचारी तसेच राखीव कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विभागाची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली. सेक्टर अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच FST, VST, VVT, SST आणि CRC पथकांनी आचारसंहिता अंमलबजावणी, खर्च नियंत्रण व तक्रार निवारणाबाबत वेळोवेळी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम मशिन वाहतूक, साहित्य वितरण, स्ट्रॉंग रूम व्यवस्था, मतदान केंद्रांची सुविधा, वाहतूक आराखडा, मतदार सहाय्यक कक्ष, पीबी पथक, खर्च व लेखा विभाग तसेच एक खिडकी परवानगी कक्ष यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणुकीच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या.
यानंतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक कार्यक्रम, मतदान प्रक्रिया, मतमोजणी, स्ट्रॉंग रूम व्यवस्था तसेच आचारसंहितेचे पालन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
बैठकीदरम्यान श्री राजेंद्र चौधरी यांनी नामनिर्देशन पत्र ऑफलाईन भरता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच पार पडणार असल्याचे स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक ९ (ब) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काटेकोर नियोजन सुरू असून निष्पक्ष, पारदर्शक व शांततापूर्ण निवडणूक घेण्याचा प्रशासनाचा निर्धार या बैठकीतून स्पष्ट झाला.




