खर्ची–नागदूली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य , दुरुस्तीला मुहूर्त कधी? नागरिकांचा संतप्त सवाल..!

एरंडोल प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील खर्ची–नागदूली या सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही ठिकाणी खडी व इतर साहित्य टाकून ठेवण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना संबंधित विभागाकडून दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रस्त्यालगत टाकून ठेवलेले साहित्य अनेक दिवसांपासून तसेच पडून असून, त्याची नासाडी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ दिखाऊ तयारी न करता प्रत्यक्ष काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
सध्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण इतके वाढले आहे की वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, वाहन घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या मार्गावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खर्ची, रवंजे, नागदूली व परिसरातील गावांतील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दैनंदिन प्रवास त्रासदायक बनला आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
“दुरुस्तीचे साहित्य टाकून अनेक दिवस झाले, पण काम सुरू करण्यासाठी प्रशासनाला नेमका मुहूर्त कधी मिळणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





