जळगावमहाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक अशोक काकडे यांची एरंडोल तालुक्यात मतदान केंद्रांना भेट…

एरंडोल : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६च्या अनुषंगाने मा. निवडणूक निरीक्षक अशोक काकडे यांनी एरंडोल तालुक्यात भेट देऊन मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह एरंडोल तहसीलदार गोपाळ पाटील, पारोळा व धरणगाव येथील तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच नगरपरिषदांचे मुख्याधिकारी अमोल बागुल उपस्थित होते.

पाहणी दरम्यान काकडे यांनी दिनांक १८ जून२०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, मतदान साहित्याची उपलब्धता, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती, तसेच मतदान केंद्रांवरील वीज, पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली.

याशिवाय दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विशेष सुविधांचा आढावा घेण्यात आला. निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावरील कार्यवाही तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सूचना काकडे यांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून निवडणुकीची तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या पाहणीमुळे निवडणूक यंत्रणेच्या तयारीला अधिक गती मिळणार असून आगामी निवडणूक सुरळीत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button