जळगावमहाराष्ट्र

एम.ए. अभ्यासक्रमात ॲड. विलास मोरे यांच्या साहित्याचा समावेश; साहित्य क्षेत्रात अभिमानास्पद यश.

प्रतिनिधी : एरंडोल येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी व विधिज्ञ ॲड. विलास कांतिलाल मोरे यांच्या साहित्याला आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे. त्यांच्या “मुक्या विहिरीचा आवाज” या कादंबरी तथा विचारचिंतनिकेतील “सुनबाई” हा कथाभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या भाषा प्रशाळा व संशोधन विभागाच्या एम.ए. प्रथम वर्ष “साहित्य समीक्षा : सिद्धांत आणि उपयोजन” या अभ्यासपत्रिकेत या कथाभागाचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे.
यापूर्वीही ॲड. मोरे यांच्या “पांढरे हत्ती आणि काळे दात” या कादंबरीचा एम.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. तसेच कला शाखेच्या प्रथम वर्ष मराठी अभ्यासक्रमात त्यांच्या “ललकारी” या कथासंग्रहातील “धोंड्या” ही कथा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध आहे. इयत्ता पहिलीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातही त्यांची कविता समाविष्ट असून ती बालकांच्या ओठांवर रेंगाळताना दिसते.
शालेय स्तरापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कथा व कवितांचा अभ्यास करण्याची संधी मिळत असल्याने साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित झाले आहे. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा बालकवी पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
नुकतीच दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली त्यांची “वाघी” ही बालकुमार सचित्र कादंबरी वाचकांसह समीक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. महसूल खात्यातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर वकिली व्यवसाय करत असतानाही त्यांनी साहित्य क्षेत्रात भरीव कार्य केले असून त्यांच्या नावावर तब्बल २० दर्जेदार पुस्तकांची ग्रंथसंपदा आहे.
एरंडोलच्या या साहित्यिकाच्या यशाबद्दल मानवतावादी विचारवंत तथा ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. म. सु. पगारे, डॉ. दीपक खरात, महेश सूर्यवंशी, प्रा. वा. ना. आंधळे, प्रा. डॉ. युवराज पवार, कवयित्री शीतल पाटील, साहित्यिक एकनाथ आव्हाड, ॲड. मोहन बी. शुक्ला, प्रा. आत्माराम चिमकर, ॲड. आय. जी. शेख यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
एरंडोलसारख्या ग्रामीण भागातून साहित्याच्या माध्यमातून राज्यभर ठसा उमटवणाऱ्या ॲड. विलास मोरे यांच्या या यशामुळे साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button