एरंडोलच्या नवीन सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा; नागरिकांकडून तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी

एरंडोल:- येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाची अत्याधुनिक व वातानुकूलित नवीन इमारत पूर्णत्वास आली असूनही अद्याप उद्घाटनाअभावी ती वापरात आलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून नवीन इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करून कार्यालय कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरत आहे.
गेल्या सुमारे वर्षभरापासून सह दुय्यम निबंधक कार्यालय धरणगाव रस्त्यावरील भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. नवीन इमारतीचे सर्व बांधकाम पूर्ण झाले असून आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही कार्यालयाचे स्थलांतर अद्याप झालेले नाही. परिणामी, खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणीचे व्यवहार नवीन इमारतीत नेमके कधी सुरू होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या कार्यालय एका ठिकाणी, दस्तावेज लेखक आणि स्टॅम्प विक्रेते जुन्या तहसील कार्यालयाजवळ उपलब्ध जागेत कामकाज करत असल्याने नागरिकांना वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. यामुळे वेळेचा अपव्यय होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
तालुक्यातील नागरिकांनी संबंधित प्रशासनाने नवीन सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन तातडीने करून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, जेणेकरून सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी केली आहे.





