बीएलओ कामामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल; सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते १२.३५ पर्यंत वर्ग

एरंडोल:-मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेसाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या २७ जून २०२६ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर (भा.प्र.से.) यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
सुधारित वेळापत्रकानुसार सोमवार ते शुक्रवार शाळा सकाळी ७.०० ते दुपारी १२.३५ वाजेपर्यंत भरतील. शनिवारी शाळा नियमित वेळेनुसारच सुरू राहतील. तसेच, अखेरच्या कला, क्रीडा व कार्यानुभवाच्या तासिकेऐवजी नियमित अध्यापनाच्या तासिका घेण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय नियोजनानुसार ‘निपुण’ तासिका सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत नेहमीप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे एका बाजूला मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम सुरळीत पार पडणार असून, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या अध्यापनात व्यत्यय येऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने नियोजनबद्ध पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.





