ग्रामस्थांचा तीव्र विरोध; निपाणे येथील स्मशानभूमी बांधकाम थांबविण्याची मागणी.

प्रतिनिधी एरंडोल:- तालुक्यातील निपाणे गावातील स्मशानभूमीच्या बांधकामावरून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती एरंडोल यांना निवेदन सादर केले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील स्मशानभूमीचे बांधकाम कोणताही ग्रामसभा ठराव किंवा ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव न घेता सुरू करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी नव्याने बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी पूर्वीची स्मशानभूमी सुस्थितीत अस्तित्वात असताना ती पाडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सदर जागा निर्लेखित करण्याचा कोणताही आदेश नसताना तसेच पाडकामासंदर्भात शासनाचा अधिकृत आदेश नसताना संबंधित ठेकेदाराने मनमानी पद्धतीने जुनी स्मशानभूमी पाडून त्याच जागेवर नवीन बांधकाम सुरू केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी पर्यायी जागेचाही प्रस्ताव प्रशासनासमोर मांडला आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट क्रमांक २७ मध्ये जुन्या स्मशानभूमीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर जागा उपलब्ध असतानाही त्याच जुन्या जागेवर बांधकाम करण्याचा हट्ट धरला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच ग्रामसेवकांनी दिलेल्या सूचनांचेही पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सदर बांधकामाची चौकशी करून काम तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. कमलाकर पाटील, उमेश महाजन, राहुल भारी, प्रमोद पाटील, अर्जुन माळी, विशाल पाटील, पंकज पाटील, संजय पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन पंचायत समितीकडे सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, बांधकामाबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे.





