उत्राण अहिर हद्द येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाचा धडक प्रहार; वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

प्रतिनिधी एरंडोल :- तालुक्यातील मौजे उत्राण अहिर हद्दीत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत वाळू माफियांना मोठा दणका दिला. तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उत्राण भागाचे मंडळ अधिकारी नदीम शेख व उत्राण अहिरचे ग्राम महसूल अधिकारी रविराज पाटील यांनी ख्वाजा मियां दर्गा परिसरातील नदीपात्राची संयुक्त पाहणी केली. यावेळी नदीपात्रात बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून वाहतुकीसाठी तयार ठेवण्यात आलेले वाळूचे तराफे आढळून आले.
तत्काळ कारवाई करत महसूल पथकाने घटनास्थळीच हे वाळूचे तराफे जाळून पूर्णपणे नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
महसूल प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, तालुक्यात कुठेही अवैध वाळू उपसा, साठा किंवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





