जळगावमहाराष्ट्र

गणेशोत्सव-नवरात्रीपूर्वी अमृत २.०ची कामे पूर्ण करा; रस्ते पूर्ववत करण्याचे निर्देश….

नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांची आढावा बैठकीत सूचना; नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यावर भर

प्रतिनिधी – एरंडोल शहरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या अमृत २.० पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा महत्त्वपूर्ण आढावा नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीला उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी, गटनेते तथा नगरसेवक मनोज पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, संबंधित कंत्राटदार व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेला कडक सूचना देण्यात आल्या.

पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले असून, नागरिकांना वाहतुकीचा व दैनंदिन कामकाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खोदलेले सर्व रस्ते तातडीने पूर्ववत करून दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करण्याचे निर्देश नगराध्यक्ष डॉ. ठाकूर यांनी दिले.

यावेळी गणेशोत्सव व नवरात्री हे प्रमुख सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीचे मार्ग, प्रमुख चौक आणि शहरातील अंतर्गत रस्ते सणांपूर्वीच पूर्णपणे दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावेत, यावर विशेष भर देण्यात आला. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून शहरातील सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि कंत्राटदारांनी समन्वयाने काम करावे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

शहराला स्वच्छ, निर्जंतुक व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबरोबरच पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच अमृत २.० योजनेतील प्रत्येक काम दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना देण्यात आले.

नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, गटनेते तथा नगरसेवक मनोज पाटील आणि उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत २.० योजनेची कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करत, गणेशोत्सव आणि नवरात्रीपूर्वी प्रमुख रस्ते नागरिकांसाठी खुले व सुरक्षित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button