जळगावधार्मिकमहाराष्ट्रवैद्यकीय

समाजातील दुर्बलांना नवदृष्टी देण्याचे कार्य गौरवास्पद : श्रीकांत धिवरे

मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलतर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

 विशेष प्रतिनिधी –   समाजातील दुर्बल घटकांतील अनेकांना विविध आरोग्यविषयक समस्यांवर मात करताना आर्थिक स्तरावर मोठी कसरत करावी लागते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. मात्र, सामाजिक बांधिलकी जोपासत दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मंगळग्रह सेवा संस्था व पनवेल (जि. रायगड) येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अगदी मोफत स्वरूपात भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले जाते. गेल्या काही दिवसांत जवळपास बाराशे पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांना नवदृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या दोन्ही संस्थांनी केले आहे. ही बाब अतिशय गौरवास्पद आहे, असे मत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केले. येथील मंगळग्रह सेवा संस्था व पनवेल (जि. रायगड) येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आयोजित भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर व ‌‘सीईओ‌’ आर. जी. चव्हाण उपस्थित होते. शिबिरा दरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. गुरुप्रीतसिंग राठोड, डॉ. विजय बाम्हणे, डॉ.अनिल मुंडे तसेच सहाय्यक प्राची गायकवाड, नेत्रा गोडवे यांनी नागरिकांची तपासणी केली. एकूण 137 नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदविला. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर 72 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्यात आल्या. तत्पूर्वी नेत्र तज्ज्ञांचा रुग्णांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. हे सर्व रुग्ण सायंकाळी पाचच्या सुमारास श्री मंगळग्रह मंदिरातून पनवेल कडे रवाना झाले. शस्त्रक्रियेसह आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि पुढील उपचारांची व्यवस्था संबंधित रुग्णालया मार्फत करण्यात येणार आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी तसेच वैद्यकीय पथक यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही अशा सामाजिक उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशाच आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्था सातत्याने कार्यरत आहे. त्या अनुषंगाने दर महिन्यातील तिसऱ्या रविवारी भव्य मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले जाते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविणे सुरूच राहील, अशी ग्वाही मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी याप्रसंगी दिली. सहसचिव दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button