आषाढी एकादशीनिमित्त एरंडोलमध्ये गुजर समाजाचा पारंपरिक पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्नविठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने शहर दुमदुमले; भजन, टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी भक्तीचा जागर

एरंडोल : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त एरंडोल शहरातील समस्त गुजर समाजाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संत श्री गोविंद महाराज यांच्या प्रेरणेतून अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडली. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
महादेव मंदिर-गणपती मंदिर परिसरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजविलेली विठ्ठल-रुक्मिणीची आरास आणि पालखीत विराजमान असलेल्या विठोबा-रुक्मिणीच्या मूर्ती तसेच संत श्री गोविंद महाराज यांच्या प्रतिमेने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. पालखीचे पूजन व विठ्ठल-रुक्मिणी तसेच संत श्री गोविंद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका छाया दाभाडे, कमल पाटील, भारती गुजर, गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल पाटील, विलास पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, गोरख पाटील, रामभाऊ गुजर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
माजी नगरसेविका जयश्री पाटील व संध्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळांनी टाळ, मृदंग व वीणेच्या साथीने सादर केलेली भक्तिगीते व भजने पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पांडुरंग हरी’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिला, पुरुष, युवक तसेच लहान बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने पालखी सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
पालखीने गणपती मंदिर, श्रीराम चौक, बुधवार दरवाजा, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सर्वोदय मित्र मंडळ मार्गे श्रीराम गणेश मंडळाच्या मारुती मंदिरापर्यंत मार्गक्रमण केले. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेत विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे पूजन केले.
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि समतेचा उत्सव मानला जातो. पंढरीच्या वारीची परंपरा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, त्याच भक्तिभावाची अनुभूती एरंडोलमधील या पालखी सोहळ्यातून भाविकांना मिळाली. विठ्ठल नामस्मरण, भजन-कीर्तन आणि सामूहिक भक्तीमुळे समाजात एकोपा, बंधुभाव आणि सकारात्मकतेचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
पालखी सोहळ्याची सांगता श्रीराम गणेश मंडळाच्या मारुती मंदिरात भक्तिमय वातावरणात झाली. सांगता सोहळ्यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी समस्त गुजर समाजातील महिला, पुरुष आणि बालकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षानुवर्ष जपली जात असलेली ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.





