माझ्या एरंडोल मतदारसंघासाठी ‘”सरसकट विशेष मदत पॅकेज” जाहीर करण्याची आमदार ॲड. अमोल पाटील यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी…

प्रतिनिधी एरंडोल – जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगाव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती, गुरेढोरे, घरे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अक्षरशः अनेकांचे संसार महापुराच्या पाण्यात वाहून गेलेत.या पार्श्वभूमीवर एरंडोलचे आमदार ॲड. अमोल पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा ना श्रीमती सुनेत्राताई अजित पवार,आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. मकरंद आबा जाधव साहेब,व पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेबांकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून तातडीने विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.
आमदार पाटील यांनी आपल्या निवेदनात NDRF व SDRF चे निकष शिथिल करून सरसकट विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, तसेच प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून कोणताही शेतकरी किंवा बाधित नागरिक शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी केली आहे.
तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत वितरित करून त्यांचे जनजीवन पूर्ववत करण्यासाठी विशेष पुनर्वसन उपाययोजना राबवाव्यात, अशीही त्यांनी विनंती केली आहे.
पूरग्रस्त व संकटग्रस्त नागरिकांना शासनाचा भक्कम आधार मिळणे अत्यंत आवश्यक असून, या मानवी संवेदनांशी निगडित विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन एरंडोल, पारोळा व भडगाव तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी एरंडोल मतदार संघाचे आमदार ॲड. अमोल चिमणराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री,व पालकमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.





