एरंडोल आगाराला मिळाल्या ५ ‘जिजाऊ’ बस; आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

प्रवाशांच्या सुविधेत होणार मोठी वाढ; लोकार्पणानंतर आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव
प्रतिनिधी एरंडोल : एरंडोल विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, एरंडोल आगाराला पाच नवीन ‘जिजाऊ’ बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसचे लोकार्पण गुरुवारी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोजभाऊ पाटील, जिल्हा समन्वयक जगदीशदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, एरंडोल लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील, एरंडोल शिवसेना तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, पारोळा शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, एरंडोल युवासेना शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष कृष्णाभाऊ ओतारी यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, राज्य परिवहन एरंडोल आगाराचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी बससेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या आणि उपलब्ध बसची संख्या यामध्ये तफावत असल्याने अनेक मार्गांवर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार अमोलदादा पाटील यांनी एरंडोल आगारासाठी नवीन बस उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर पाच नवीन ‘जिजाऊ’ बस एरंडोल आगारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एरंडोल तालुक्यासह विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील बससेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसह दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून, अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आमदारांनी स्वतः चालविली बस
लोकार्पण सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी स्वतः बसचे स्टेअरिंग हाती घेत बस चालविली. त्यांनी बस चालवून प्रवासाचा अनुभव घेतला. यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना आमदार अमोलदादा पाटील म्हणाले की, मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. रस्ते, पाणी, शिक्षण व आरोग्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणेही आवश्यक आहे. एरंडोल आगाराला मिळालेल्या पाच नवीन जिजाऊ बसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. भविष्यातही मतदारसंघातील बससेवा अधिक सक्षम करण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन पाच बसच्या माध्यमातून एरंडोल आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळाले असून, ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.





