एरंडोल शहरासह तालुक्यात कानबाई माता उत्सवाचा उत्साह; विसर्जन मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

प्रतिनिधी एरंडोल : खानदेशातील लोकपरंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा कानबाई माता उत्सव एरंडोल शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासून शहरातील विविध भागांतून कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुका वाजत-गाजत काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाही गायन, भजने आणि महिलांच्या सहभागामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कानबाई माता ही खानदेशातील एक महत्त्वाची लोकदेवता मानली जाते. श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. घरात किंवा मंडपात केळी व कण्हेरीचे खांब उभारून आकर्षक सजावट केली जाते. कलशावर नारळाची स्थापना करून त्याला नथ व डोळ्यांची पारंपरिक रूपरेषा देत कानबाई मातेची स्थापना केली जाते.
उत्सवातील ‘रोट’ हा विशेष आकर्षणाचा भाग असतो. गव्हाच्या पिठापासून तयार केलेला पुरणपोळीप्रमाणे विशेष रोट नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. कुटुंबीय व आप्तेष्टांमध्ये हा प्रसाद वाटण्याची परंपरा आहे. तसेच महिलांकडून रात्री पारंपरिक अहिराणी लोकगीते, ओव्या आणि फुगडीचे आयोजन केले जाते.
सोमवारी सकाळी सुमारे दहा वाजेपासून एरंडोल शहरातील विविध भागांतून कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दिवसभर विविध परिसरांमधून चौरंग वाजत-गाजत मिरवणुकीने आणण्यात येत होते. शहरातील पुरातन अंजनी नदीकाठी असलेल्या महादेव मंदिर परिसरात कानबाई मातेचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
एरंडोल शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्येही कानबाई माता उत्सव श्रद्धा, उत्साह आणि पारंपरिक प्रथांचे जतन करत साजरा करण्यात आला. आधुनिकतेच्या काळातही खानदेशातील लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उत्सवाच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र दिसून आले.





