जळगावमहाराष्ट्रसांस्कृतिक

एरंडोलमध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानचा महिलांसाठी हळदीकुंकू उत्सव उत्साहात; सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक समन्वयाचा सुंदर संगम

एरंडोल – येथील जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक हळदीकुंकू कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या या प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही श्रीराम चौक परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
       कार्यक्रमाची सुरुवात तुळशी पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक देवयानी पाटील (धुळे), सरला पाटील, नगरसेविका छाया दाभाडे, डॉ. गीतांजली ठाकूर, डॉ. प्रियंका वाघ व डॉ. आसावरी पाटील, शोभा पाटील, जया महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने सांस्कृतिक परंपरेला सामाजिक संदेशाची जोड दिली.
मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक देवयानी पाटील यांनी महिलांनी स्वतःचे अस्तित्व ओळखून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे व आपल्या शिक्षणाचा समाजहितासाठी उपयोग करावा, असे आवाहन केले. डॉ. प्रियंका वाघ यांनी वयोमर्यादेनुसार महिलांनी स्वतःची काळजी घेणे, सकस आहाराचे महत्त्व आणि आरोग्यविषयक जनजागृती यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
    नगरसेविका छाया दाभाडे यांनी सामाजिक जीवनात माणुसकीचा धर्म जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित करत, “पैशापेक्षा माणसाची किंमत मोठी आहे. इर्षा न ठेवता आपुलकीने जगावे,” असा संदेश दिला. या कार्यक्रमात परिसरातील सुमारे ३०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी सर्व महिलांना संक्रांतीचे वाण, सौभाग्याचे लेणे म्हणून हळदी कुंकू व तिळगुळ वाटप करण्यात आले. धार्मिक विधी सोबतच आपुलकी, स्नेह आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन या कार्यक्रमातून घडले.
    दरम्यान, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार समारंभही यावेळी पार पडला. जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे गेल्या बारा वर्षांपासून गरिबांसाठी दिवाळी फराळ वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे व अध्यात्मिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम चौक प्रदीप फराटे, अमर महाजन ऋषिकेश महाजन, जगलु पाटील देव जाधव, धीरज पाटील, कुणाल लोहार, प्रशांत लोहार, अजय जाधव, टोनी शिरवानी,जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर पाटील, ओम महाजन,अर्णव पाटील, एरंडोलमध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानचा महिलांसाठी हळदीकुंकू उत्सव उत्साहात; सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक समन्वयाचा सुंदर संगम ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button