जागतिक एड्स दिनानिमित्त शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय एरंडोलतर्फे जनजागृती रॅली

एरंडोल – शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एकक आणि ग्रामीण रुग्णालय, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एरंडोल शहरात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाच्या निमित्ताने समाजामध्ये एड्सविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
रॅलीमध्ये महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रॅलीचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. मुकेश चौधरी (वैद्यकीय अधिकारी), डॉ. पराग कुलकर्णी (उपप्राचार्य, शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी), श्री अंकुश थोरात (समुपदेशन विभाग), श्री वीरेंद्र बिर्हाडे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), श्री दीपक गायकवाड (आरोग्य सेवक) तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
रॅलीची सुरुवात आर. टी. काबरे हायस्कूल येथून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक — मुख्य रस्ता — आणि परत काबरे हायस्कूल असा मार्गक्रमण करत विद्यार्थ्यांनी ‘एड्सबाबत जागरूकता वाढवा’, ‘सुरक्षित राहा – आरोग्य जपा’ अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे एचआयव्ही/एड्ससंबंधीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमादरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी एचआयव्ही/एड्सची माहिती, प्रतिबंधात्मक उपाय आणि जागरूकतेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये एड्सविषयी जागरूकता वाढून सुरक्षित, संवेदनशील आणि निरोगी समाज निर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयातील श्री अंकुश थोरात, तसेच शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. अनुप कुलकर्णी, प्रा. जावेद शेख, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी ,जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले




