शितल अकॅडमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम; विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात..

प्रतिनिधी एरंडोल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एरंडोल येथील शितल अकॅडमीमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच भव्य बक्षीस वितरण समारंभाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक आणि मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर, उप नगराध्यक्ष सुनीता महाजन, सामाजिक कार्यकर्ते रुपेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक अनिल महाजन, मयुर महाजन, रवींद्र महाजन, अतुल महाजन, आरती महाजन, तसेच कुणाल महाजन, शारदा मराठे, भारती पाटील आणि विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शितल अकॅडमीचे संचालक योगेश महाजन सर आणि त्यांचे बंधू राजेश महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी योगेश महाजन सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले.





