क्राईमजळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

हळदीत ‘कट्टा’ची एन्ट्री; युवक अटकेत, जिवंत काडतूस जप्त..

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील ताडे येथे आयोजित हळदी समारंभात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या युवकाला कासोदा पोलिसांनी अटक करत एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मे २०२६ रोजी ताडे येथे हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांमध्ये लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) हा युवकही उपस्थित होता. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास बँडवर नाचत असताना काही नागरिकांच्या निदर्शनास त्याच्या कमरेला गावठी कट्टा (पिस्टल) असल्याचे आले. याबाबत विचारणा होताच संबंधित युवकाने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

या घटनेची माहिती कासोदा पोलीस ठाण्याला मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पुन्हा ताडे गावात संशयास्पद हालचाली करत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला. भातखेडे चौफुली येथे कारवाई करत पोलिसांनी लखन वाघ याला ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीला पुढील कारवाईसाठी कासोदा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button