उपखेड येथे विद्यार्थ्यांसाठी योग शिबिरास प्रारंभ
शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी पुढाकार

प्रतिनिधी – उपखेड ता. चाळीसगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या प्रथम वर्ष सत्राच्या अभ्यासक्रमांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उपखेड येथे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी एक महिन्याच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा विठ्ठल पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शिबिरात सहभाग नोंदवला असून नियमितपणे योगाभ्यासाचा लाभ घेत आहेत.
योगशास्त्र विभागाच्या वतीने श्री. राहुल शिवाजी जाधव हे विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानाचे मार्गदर्शन करीत आहेत. योगामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यास, शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यास व मानसिक ताण कमी होण्यास मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या शिबिरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे योगशास्त्र विभाग प्रमुख मा. इंजी. प्रा. राजेश पाटील, डॉ. लीना चौधरी, प्रा. गीतांजली भंगाळे तसेच प्रा. लिंता चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून शाळा व विद्यापीठाचा हा संयुक्त उपक्रम निश्चितच विद्यार्थ्यांच्या आरोग्यदृष्ट्या लाभदायक ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



