जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा;  भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था..

प्रतिनिधी एरंडोल:- तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय येथे आज अंगारिका चतुर्थीच्या पावन निमित्ताने धार्मिक उत्साहात विविध कार्यक्रम पार पडले. पहाटे ४ वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विधीवत महापूजा व आरती संपन्न झाली. यावेळी एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील उपस्थित होते.

महापूजा व आरतीनंतर संस्थानतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे व तहसीलदार गोपाळ पाटील यांचा शाल, श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ॲड. आनंदराव पाटील, भिका महाजन, डॉ. पी. जी. पिंगळे, अशोक पाटील, शिरीष बर्वे आर्किटेक्चर तसेच पद्मालय देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

अंगारिका चतुर्थीचे औचित्य साधून पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळी ४ वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महापूजा व आरतीनंतर सकाळी ५ वाजता भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. सायंकाळी आरती होऊन नैवेद्य दाखवला जातो. शेवटचा फक्त येईपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात येते. दिवसभर हजारो भक्तांनी गणरायाचे दर्शन घेतले.

पद्मालय हे भगवान गणपतीचे प्राचीन व जागृत स्थान असून येथे एकाच मंदिरात दोन स्वयंभू गणेश मूर्ती असल्यामुळे या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. मंदिर परिसरातील कमळांनी नटलेल्या सरोवरामुळे ‘पद्मालय’ हे नाव पडले आहे. येथे दर्शन घेतल्याने संकटे, अडथळे व दुःख दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाद्रपद, माघ तसेच संकष्टी चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. विशेष म्हणजे अंगारिका चतुर्थी हा दिवस गणपती व मंगळाशी संबंधित असल्यामुळे अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी उपवास केल्यास वर्षभराच्या संकष्टीचे पुण्य लाभते, मनोकामना पूर्ण होतात व संकटांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे पद्मालय येथे अंगारिका चतुर्थीला दर्शन घेणे अत्यंत शुभ व फलदायी मानले जाते.

यात्रेनिमित्त भाविकांसाठी संस्थानतर्फे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अभिषेक व पूजा-अर्चनेसाठी मंदिराच्या मागील बाजूस पेंडॉल उभारण्यात आला असून भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी ग्रीन नेटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंदिर गाभाऱ्यात फॅन व कुलरची सुविधा, तसेच पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे.

पद्मालय देवस्थानचे विश्वस्त डॉ. पी. जी. पिंगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून यात्रेदरम्यान भाविकांना स्वखर्चाने मोफत वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. ते सप्तशृंगी गड व शनिमहाराज मंदिर येथेही यात्रांमध्ये अशीच सेवा देत असतात.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज झाले असून एरंडोल बस आगारातून पद्मालयसाठी विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड पथक तैनात करण्यात आले असून भाविकांची गर्दी व वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे.

अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने पद्मालय येथे भक्तिभाव, शिस्तबद्ध व्यवस्था आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे यात्रा उत्साहात व सुरळीत पार पडत असून हजारो भाविकांनी या पवित्र योगाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button