जळगावमहाराष्ट्र

महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६हे जनविरोधी नियम तात्काळ रद्द करा ……!

माहिती अधिकार कार्यकर्त्याचे उद्या आझाद मैदानावर आंदोलन

मुंबई, : महाराष्ट्र शासनाने दिनांक १२ जून २०२६ रोजी जाहीर केलेले महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६ हे माहिती अधिकार कायदा २००५ च्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारे असून ते तात्काळ रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिक यांच्या वतीने उद्या दिनांक २५ जून २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.

नवीन माहिती अधिकार नियम २०२६ नियमांनुसार माहिती अर्जाचे शुल्क पाचपट वाढविण्यात आले आहे. तसेच माहिती मागणाऱ्या नागरिकांना नागरिकत्वाचे पुरावे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तरतुदी माहिती अधिकार कायदा २००५ मधील कलम ६(२) च्या विरोधात असून नागरिकांच्या माहिती मिळविण्याच्या हक्कावर निर्बंध आणणाऱ्या आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात शासनाने लागू केलेले नियम मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

माहितीचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे प्रभावी साधन आहे. शुल्कवाढ, कारण विचारण्याची सक्ती आणि अतिरिक्त कागदपत्रांची अट यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी माहिती मिळविणे अधिक कठीण होणार आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला स्पष्ट संदेश देण्यात येणार आहे की माहितीचा अधिकार हा नागरिकांचा कायदेशीर हक्क आहे. या हक्कावर कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा प्रशासकीय बंधने लादली जाऊ नयेत.

राज्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button