साहित्य-सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल; ॲड. मोहन शुक्ला उद्घाटकपदी

प्रतिनिधी – उत्तर महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या चोविसाव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन एरंडोलचे ज्येष्ठ विधिज्ञ, साहित्यप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते ॲड. मोहन शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या चोविसाव्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथे लोकवर्गणीतून आयोजित करण्यात येणाऱ्या या एकदिवसीय साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी ही माहिती दिली.
साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या ॲड. मोहन शुक्ला यांची उद्घाटक म्हणून झालेली निवड ही साहित्य क्षेत्रासाठी गौरवाची बाब मानली जात आहे. एरंडोल येथील औदुंबर साहित्य रसिक मंचाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी साहित्यिक उपक्रमांना चालना दिली आहे. तसेच ते रिक्रिएशन टेनिस क्लबचे मागील दहा वर्षांपासून अध्यक्ष असून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
अॅड. शुक्ला यांनी तब्बल ४३ वर्षे वकिली व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत न्याय, समाजसेवा आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत कवी, लेखक, विचारवंत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. साहित्य चळवळीच्या विस्तारासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून विविध साहित्यिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे मार्गदर्शन लाभत आले आहे.
यापूर्वी जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि साहित्यावरील प्रेमामुळे अनेक साहित्यिक उपक्रमांना नवी दिशा मिळाली आहे.
यंदाच्या साहित्य संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार, समीक्षक, संशोधक आणि साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. संमेलनात साहित्यिक परिसंवाद, काव्यसंमेलने, पुस्तक प्रदर्शन, गुणवंतांचा सत्कार, पुरस्कार वितरण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ॲड. मोहन शुक्ला यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनामुळे या संमेलनाला विशेष प्रतिष्ठा लाभली असून साहित्यविश्वात संमेलनाबाबत उत्सुकता वाढली आहे. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम घडविणारे हे संमेलन राज्यातील साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.





