मध्यप्रदेशातील आरोपी कडून चोरीची रक्कम हस्तगत करणा-या पोलीसांचा कासोद्यात सर्वपक्षीय सत्कार

प्रतिनिधी एरंडोल- आजच्या सर्व सुविधायुक्त असलेल्या काळात मध्यप्रदेशातील या गावात २/४ पोलिस जाऊ शकत नाही,मोठे पथक न्यावे लागते,एवढी दहशत या गावात असल्यावर देखिल ४ दिवसांच्या महाप्रयासांनी आदिवासी महिलेचे चोरलेले पैसे कासोदा पोलीसांनी परत मिळवल्याबद्दल दि.११ रोजी त्यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी या तिन्ही पोलीसांनी त्या गावातील दहशतीचा थरार कथन केला.
२१जुलै रोजी बैंकेतून पैसे काढल्या नंतर लक्ष ठेऊन असलेल्या चोरांनी सोनबर्डीच्या आशाबाई देवरे यांच्या साडीवर घाणेरडा पदार्थ फेकून ४७६३०/- रु. भरदिवसा चोरुन नेले होते, गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहून हे आरोपी मध्यप्रदेशातील असल्याची खात्री झाल्या नंतर वरिष्ठांच्या परवानग्या वगैरे घेऊन सपोनि श्रीकांत पाटील यांनी तीन जणांची टिम या मोहिमेवर पाठवली होती.
सासी कडीया ता.पचोर जि. राजगड या गावात स्थानिक बोडा पोलीसांच्या मदतीने आरोपी निखिल व आलोक सिसोदिया पर्यंत पोहचण्यासाठी गेलो होतो.तेथे जातांना स्थानिक पोलीसांनी दिवसा नेलेच नाही, रात्री १० वाजेनंतर घेऊन नेले, जातांना अंगावर सुरक्षा कवच,हेल्मेट व संभाव्य हल्याचा प्रतिकार करण्याची तयारी करण्यात आली, गावात महिलाच होत्या, पुरुष गायब होते,आमच्या सोबत हरियाणा,राज्यस्थान पंजाबसह महाराष्ट्रातील दोन टिम देखिल याच आरोपींच्या शोधार्ध आलेले होते.यावेळी संबंधित आरोपीची आई घरी सापडली,तिला घेऊन आम्ही पोलिस ठाण्यात आलो तेथे ५ तासांच्या मेहनतीनंतर पैसे वसूल करण्यात आल्याची माहिती पथकातील स्वप्नील परदेशी,दिपक देसले व नंदलाल परदेशी यांनी घटनेचा थरार कथन केला.
यावेळी भाजपाच्या महानंदा पाटील,उद्धव सेनेचे समाधान चौधरी,शिंदे सेनेचे महेश पांडे,कांग्रेसचे सुरेश पवार,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अजीज बारी,मनसेचे संदिप चौधरी,सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी,तेली समाजाचे अध्यक्ष भास्कर चौधरी सरपंच पुरुषोत्तम चौधरी,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील,अंतूर्ली चे छोटू पाटील असे सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टिम मधिल पोलीसांचा शालश्रीफळ देऊन सत्कार केला,यावेळी सपोनि श्रीकांत पाटील, पोउनि.धर्मराज पाटील हे उपस्थित होते.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले, स्वप्नील परदेशी यांनी आभार मानले.
चौकट
या गावातील सर्व घरे कोटी दिड कोटी रुपये खर्चून बांधलेली आहेत,एक भाऊ उच्च शिक्षीत तर दूसरा भाऊ चोर अशी परिस्थती आहे,या गावात गावठी कट्टे मोठ्या प्रमाणात आहेत,दगडफेक नित्याचीच,जेवढ्या पोलीस टिम आल्या होत्या त्यांची रिकव्हरी ४ लाख,५लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होती,फक्त आमच्या टिम ची सर्वात कमी ४७ हजार रुपये एवढीच होती,ही रक्कम देखिल ४ गुन्हेगारांनी वाटून घेतलेली होती,पण आम्ही पैसे परत मिळवण्यात यशस्वी झालो आहोत,अशी ही माहिती या टिम सदस्यांनी दिली आहे.





