एरंडोलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; राष्ट्रध्वजाला मानवंदना

एरंडोल : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन एरंडोल शहरात देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवारी (१५ ऑगस्ट) सकाळी ९.०५ वाजता प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी पोलिस दल आणि होमगार्डच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत संचलन केले. कार्यक्रमास तहसीलदार गोपाल पाटील, पोलिस निरीक्षक सुनील पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बागुल, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारी याबाबत उपस्थितांना संदेश देण्यात आला.
दरम्यान, एरंडोल शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, नगरपालिका, शासकीय कार्यालये तसेच पोलिस ठाणे आदी ठिकाणीही उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. विविध ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण एरंडोल शहरात दिवसभर देशभक्तीचा जल्लोष आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.





