पाचोरा तहसील कार्यालयातील गैरप्रकारांविरोधात सामाजिक कार्यकर्ता पंकज पाटील यांची तक्रार व पाठपुरावेअंती नोटीस

विशेष प्रतिनिधी : पाचोरा तहसील कार्यालयातील मनमानी, नियमभंग आणि अधिकारांचा गैरवापर याविरोधात सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज राजेंद्र पाटील यांनी विभागीय महसूल आयुक्त, नाशिक यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. तहसीलदार विजय बनसोड आणि नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी गंभीर प्रशासनिक व अर्धन्यायिक उल्लंघने केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पाटील यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तारखेडा खुर्द येथील गट क्र. १७२/१ मधील वारस नोंद प्रकरणात नायब तहसीलदार यांनी सक्षम अधिकार नसताना स्वतंत्र प्रोसिडिंग चालवून नोटिसा बजावल्या. मामलेदार कायद्यानुसार नोंद कमी किंवा रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असताना, तहसील कार्यालयाने हे अधिकार स्वतः वापरून कायद्याचे उल्लंघन केले आहे.
तसेच संबंधित प्रकरणात निकाल उशिरा देण्यात आला असून, आदेशपत्रात अपील प्राधिकरणाचा उल्लेख न करता साध्या पत्राद्वारे प्रकरण निकाली काढले गेले, अशी तक्रार आहे. ही प्रक्रिया अर्धन्यायिक तत्वांचे उल्लंघन करणारी असून, न्यायप्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते, असे पाटील यांनी नमूद केले आहे.
महसूल विभागाच्या ३१ मार्च २०२५ च्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून तहसील कार्यालयाने गावठाणलगतच्या २०० मीटर परिसरातील शेतकऱ्यांना सरसकट नोटिसा बजावल्या आहेत. ही कारवाई भूमाफियांना अनुकूल व्हावी म्हणून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, तहसील कार्यालयाशी संबंधित शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाखांच्या अनुदान घोटाळ्यात लॉगिन आयडीचा दुरुपयोग झाल्याबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे वर्तन लोकशाही प्रशासनाच्या तत्त्वांना विरोधी असून, जनतेचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर तात्काळ निलंबन व विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पाटील यांनी इशारा दिला आहे की, सात दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास हे प्रकरण मुख्यमंत्री कार्यालय, लोकायुक्त आणि न्यायालयाकडे पाठवले जाईल.




