कापडणेत नूतन माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..

विशेष प्रतिनिधी – कापडणे कापडणे येथील नूतन माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. पी. माळी होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे दीपक दिलीप माळी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी महान व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक डी. पी. माळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संविधान निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान स्पष्ट करत संविधानातील समानता, बंधुता व न्याय या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करून शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली. यामध्ये एस. पी. एंडाईत, ए. डी. पाटील, बी. ए. माळी, एस. सी. महाजन, व्ही. डी. शिरसाठ, के. एल. ठाकरे, पी. सी. धनगर, जी. वाय. जगताप, व्ही. आर. माळी, डी. डी. सोनवणे, जी. एस. कुवर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. एंडाईत यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्ही. डी. शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.





