जळगावमहाराष्ट्र

एरंडोल बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम; २०० मीटर नो-पार्किंग झोनची कडक अंमलबजावणी

प्रतिनिधी एरंडोल : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात एरंडोल आगाराने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार व शासनाच्या धोरणानुसार बसस्थानक परिसरातील २०० मीटर “नो-पार्किंग झोन” ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार बसस्थानक परिसरातील २०० मीटर अंतरात कोणत्याही प्रकारची अवैध प्रवासी वाहतूक अथवा प्रवासी उचलण्यासाठी वाहने उभी करण्यास मनाई आहे. मात्र काही ठिकाणी रिक्षा, काळी-पिवळी वाहने व इतर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने बसस्थानकाच्या परिसरात उभी राहून एजंटमार्फत प्रवाशांना आकर्षित करीत असल्याचे निदर्शनास आले होते.

या पार्श्वभूमीवर एरंडोल आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे एरंडोल बसस्थानक परिसरातील २०० मीटर नो-पार्किंग झोनमधून रिक्षा, काळी-पिवळी वाहने तसेच इतर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने हटविण्यात आली. संबंधित वाहनचालकांना शासन नियमांची माहिती देऊन भविष्यात नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येत घट होण्याबरोबरच वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि नियमबाह्य मालवाहतुकीस प्रोत्साहन मिळत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व शिस्तबद्ध करण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एरंडोल आगार प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित आणि अधिकृत सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करण्याचे आवाहन केले असून बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक अथवा एजंटगिरी आढळल्यास संबंधित यंत्रणांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button