जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांची फरफट

एरंडोल नगर परिषदेत अर्ज केल्यानंतरही मंजुरीसाठी विलंब; नागरिकांमध्ये संताप
एरंडोल : शहरातील नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एरंडोल नगर परिषदेत वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे नगर परिषदेत जमा केल्यानंतरही पुढील प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नगर परिषदेकडे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित प्रकरणे जळगाव जिल्हा परिषदेकडून मंजुरी (अप्रूव्हल) मिळण्यासाठी पाठविली जातात. मात्र, या मंजुरीच्या प्रक्रियेस विलंब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अपेक्षित कालावधीपेक्षा अधिक वेळ लागत असून, नागरिकांना पुन्हा-पुन्हा नगर परिषदेत येण्याची वेळ येत आहे.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र हे विविध शासकीय तसेच वैयक्तिक कामांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने त्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात यावे लागणे गैरसोयीचे ठरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत कोणत्या टप्प्यावर विलंब होत आहे, याची नागरिकांना स्पष्ट माहिती मिळावी तसेच मंजुरीची प्रक्रिया जलद करून प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगर परिषद व संबंधित जिल्हा परिषद यंत्रणेने समन्वय साधून ही प्रक्रिया सुलभ व गतिमान करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





